Home

|| ॐ नमो शिवाय ||                              

संताची, वीरांची, शूरांची तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणजे महाराष्ट्र !  तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुनीत झालेल्या आणि  सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हटकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या व जुन्नर शहराच्या उत्तरेला ८ किमी अंतर असलेले  एक आदिवासी ८ – ९  वाड्यांचे गाव म्हणजेच  – गोद्रे.

जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावाच्या भूमीला देखील अगदी अनादी कालापासून धार्मिक परंपरा आहे. या गावातील डोंगरावरील अत्यंत पवित्र व जागृत महादेवाचे देवस्थान म्हणजे अर्थातच ||” श्री *क्षेत्र* हटकेश्वर “|| 

संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे  ” ना तरी काखेसुनि वसुंधरी | जैं हिराण्यक्षु रिगाला विवरी || ते उघडले हटकेश्वरी | जेवी पातळ कुहर || ” ( संदर्भ :  ज्ञानेश्वरी – अध्याय 11 ओवी क्र.360) ज्ञानेश्वरी सारख्या धार्मिक ग्रंथात श्री क्षेत्र हटकेश्वराची महती वर्णली आहे  परंतु काळाच्या ओघात पवित्र असलेले हे जागृत महादेवाचे देवस्थान अर्थातच तिर्थक्षेत्र ” हटकेश्वर ”; परंतु अद्याप प्रसिध्दीच्या झोतापासून पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्तीभावाने श्री शंभूमहादेव हटकेश्वराच्या दर्शनास येतात. विशेषतः महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरते. आजू बाजूच्या खेड्यांतील भाविक मोठ्या संख्येने येथे दरवर्षी भक्तिभावाने  अभिषेक व दर्शना साठी न चुकता येतात. या तीर्थक्षेत्राची महती सांगायची म्हणजे महादेवाने या स्थानी ध्यानस्त बसून हटकेश्वर नामक लिंगाची स्थापना केली त्याचा अंकुर सप्तपातळे भेदून गेला व रूपाने स्थिर झाला ते आजचे श्री क्षेत्र काशिविश्वनाथ आणि त्याच्या पादुका म्हणजेच श्री क्षेत्र हटकेश्वर होय. ( संदर्भ: काशिखंड-अध्याय क्र.77- अगस्ती ऋषींना कार्तिकस्वामी यांनी सांगितलेली माहिती) म्हणूनच की काय या परिसरातील भक्त भाविक हटकेश्वराच्या दर्शनास काशीक्षेत्राचे पुण्य मानतात.  हटकेश्वराच्या दर्शनाने काशीक्षेत्राच्या दर्शनाची प्राप्ती होते. काशीखंड, दासबोध व स्कंदपुराण या ग्रंथामध्येही त्याबाबत माहिती वर्णिलेली आहे. अहो, येथील “वास्तूपाद” जलकुंडात तिर्थस्नान केल्याने शारिरीक दोष दूर होतात त्याचबरोबर येथील जलाच्या शिंपडण्याने किंवा सेवनाने वास्तूदोषही दूर होतात. (संदर्भ : स्कंदपुराण, नागरकथा – 132)  एकूणच हटकेश्वर हे अतिप्राचीन महादेवाचे पवित्र व जागृत असे देवस्थान आहे.

       हटकेश्वराच्या  डोंगरावरून आजूबाजूच्या परिसराचे दृश्य अतिशय  सुंदर, मनमोहक व नयनरम्य विलोभनीय दृश्य चहोबाजूला दिसते. उत्तरेला पायथ्याशी  पिंपळगाव जोगा धरण, पश्र्चिमेला शहाजी सागर, दक्षिणेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण  किल्ले शिवनेरी  व  अष्टविनायकां पैकी एक लेण्याद्री गणपतीचे स्थान असलेली गिरीजात्मक पर्वत रांग. पावसाळयात चहोबाजूला दिसणारे ते अप्रतिम विहंगम दृश्य याचे वर्णन करणे अशक्यच आहे. ती दृश्ये प्रत्यक्ष् आपल्या मंनचक्षूं मध्ये साठवून ठेवण्याची मजा काय औरच म्हणावी लागेल. हिरवागार शालू पांघरून नटलेली वनश्रुष्ठी, दूधसागरा प्रमाणे  धोधो वाहणारे धबधबे, ओढ्या नाल्याना आलेला महापूर, हे सर्व वर्णन करणे खरंच कठीण आहे ते तेथे जाऊन प्रत्यक्ष् बघण्यातच खरी मजा आहे. हटकेश्वराचा डोंगर म्हणजे पर्यटकांसाठीचे वरदान. या डोंगरावरील मुख्यत्वे आवर्जून पाहण्या सारखी ठिकाणे म्हणजे जुनामहादेव, पड्या हौद, नैसर्गिक पुल तथा नवरानवरीची गाठ, व-हाडी डोंगर, महादेव मंदिर, वास्तूपाद तिर्थ, साळुंखी गुहा तथा कुहर, गणपती कुहर, डोंगराचे सर्वोच्च टोक – पाणगा, घोडे पाऊल, ढोल्याचे पाणी , इत्यादी. हटकेश्वर डोंगरावरील काही भागास असलेली नावे:- आंबेझाडी, चूल, टिवय, याहळमाची, चौरा,कवाडदार,आंदरई,कावडा,लहान कावडा,भसरंड,बांध,अल्हादयांचा कडा, सादरमाळी, भरंमखाच, चिलीमखडा, पाणगा, गिधाडाची नळी, म्हतारीचा काप, भागडी, हत्तीचा गळा, माळी,आडवी माळी, लिंगी , पांढरकडा, घोडीधार,गुरांची नळी,देवाची वाट,आडव  इत्यादी नावे आहेत.

” चला तर मग, जावू या, पर्यटन, ग्रियारोहणसाठी व निसर्गसौंर्दयाची लयलूट करण्यासाठी ही सर्व माहिती वाचून श्री क्षेत्र हटकेश्वर – गोद्रे  या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची उत्सुकता मनात निर्माण होणार हे नक्की. “

मित्रहो, आपण अशा या पवित्र देवस्थानास नक्की भेट देऊन आपला आनंद द्विगुणित कराल याची खाती वाटते.

☘   श्री क्षेत्र हटकेश्वर देवस्थानगोद्रेता. जुन्नर  जि. पुणे ( महाराष्ट्र )  ☘